मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने उद्याच हंगामी अध्यक्ष निवडून बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांचा अवधी उरला आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यानंतर आता भाजपानंही उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवूच, असा विश्वास व्यक्त केला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. उद्या बहुमत सिद्ध करून दाखवूच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपाची बैठक सुरू असून, या बैठकीला अजित पवारही उपस्थित आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर पुढील भाजपाची रणनीतीवर खलबतं सुरू आहेत. त्यामुळे भाजपा उद्या बहुमत सिद्ध करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra Government : विधानसभेत उद्या बहुमत सिद्ध करून दाखवूच, भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:52 AM