मुंबई : राज्यातील तीस साखर कारखान्यांच्या विक्रीची ईडीमार्फत चौकशीची मागणी करताना त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही दोन साखर कारखान्यांची नावे प्रदेश भाजपने टाकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर राजकीय वर्तुळात सोमवारी खळबळ माजली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून चंद्रकांत पाटील यांनी ३० कारखान्यांच्या चौकशीची मागणी केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना खुलासा केला. फडणवीस म्हणाले की, गडकरी यांच्याशी संबंधित कंपनीने वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी व भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा सहकारी साखर कारखाना संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेद्वारे व न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या लिलावाद्वारे खरेदी केला. तीन-तीन वेळा लिलाव करूनही हे कारखाने खरेदी करायला कोणी पुढे येत नव्हते. शेवटी गडकरी यांनी विदर्भातील कारखाने टिकावेत यासाठी पुढाकार घेतला.फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अशीही प्रतिक्रिया दिली की, गडकरींच्या कारखान्यांवर फोकस करून या तीस कारखान्यांच्या यादीत बेभाव खरेदी करणाऱ्या कारखान्यांपासून लक्ष विचलित केले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, भाजपमध्ये गडकरींना असा त्रास देणे हे नवीन नाही. या आधीही ते राष्ट्रीय अध्यक्ष असताना असेच प्रयत्न झाले होते.
गडकरींच्या कारखान्यांप्रकरणी भाजपचा सारवासारवीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 12:27 PM