मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र काँग्रेस (युथ) सोशल मीडिया हँडलविरोधात मुंबई भाजपा सचिव प्रतीक कर्पे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. ज्या सोशल मीडियावरील अकाउंट्सवरून बनावट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याची तपशीलवार माहिती पोलिसांना देण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंट्सचा समावेश आहे.
शाह यांनी एससी/ एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपविण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडीओ खोटा आहे. यापूर्वीच्या भाषणांदरम्यान शाह म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकण्यात येईल. हा फेक व्हिडीओ महाविकास आघाडीतील युवक काँग्रेस, शरद पवार गट पक्षांच्या विविध सोशल मीडिया मंचांवर प्रसारित करण्यात आला आहे.
असा बनावट व्हिडीओ बनवून शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी करून समाजातील विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल. त्यामुळे असे कृत्य करत जनमानसातील एकोपा व सामाजिक शांतता बिघडविण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी असे कर्पे यांनी म्हटले आहे.