युतीसाठी भाजपा आश्वस्त, पण शिवसेनेची नकारघंटा, चंद्रकांत पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:44 AM2019-01-25T05:44:54+5:302019-01-25T05:45:30+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होईल, याबाबत भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आश्वस्त असून कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती होईल, याबाबत भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील आश्वस्त असून कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी युतीची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आमची युती इतकी भक्कम आहे की, तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील तरी ते भरून निघतील. कुठल्याही दिवशी युतीची घोषणा होऊ शकते. तसेच लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र खा. राऊत म्हणाले, युतीसंदर्भात कोणताच प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही. स्वत: शिवसेना पक्षप्रमुखही हा प्रस्ताव देणाऱ्या सूत्रांचा शोध घेत आहेत. लोकांची प्रपोजल स्वीकारायला आम्ही मुंडावळ्या बांधून बसलेलो नाही. शिवसेना काही लग्नाचे प्रपोजल घेऊन फिरत नाही. तसेच आम्ही ब्रह्मचर्याची शपथही घेतलेली नाही. आताच शिवसेनेबद्दल इतके प्रेम कसे उफाळून आले, इतकी वर्षे शिवसेनेसोबतचे वागणे आठवा. आता अचानक शिवसेना हवी वाटायला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, इतके नक्की, असेही राऊत म्हणाले.
>शिवसेनेने मॅरेज ब्युरो उघडला नाही
चर्चेच्या प्रस्तावाच्या बातम्या राजकीय वर्तुळातच फिरतायत. आमच्यापर्यंत प्रस्ताव घेऊन कोणी आलेले नाही आणि प्रस्ताव स्वीकारायला शिवसेनेने मॅरेज ब्युरो उघडलेला नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी युतीच्या चर्चेचे वृत्त फेटाळून लावले.
>आमची युती इतकी भक्कम आहे की, तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील तरी ते भरून निघतील.
- चंद्रकांत पाटील