लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या तीन वॉर्डांतील अँटिबॉडी सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय टोलेबाजीला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांनी स्वत:च्या रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाला मात दिली. मग, राज्य सरकार आणि महापालिकेने केले तरी काय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तर, थाळ्या, पापड आणि दिवे लावण्याचे उद्योग न करता वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोरोनाचा सामना केल्याचे प्रतिउत्तर काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजपला दिले आहे.
अँटिबॉडी टेस्टच्या अहवालानंतर आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि महापालिकेच्या कारभारावर टीका केली. सुमारे ४० टक्के मुंबईकरांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांनी स्वबळावर त्यावर मात केली आहे. कोरोना संदर्भातील पालिकेचे आणि राज्य सरकारचे दावे साफ खोटे आहेत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण केले नाही. तसेच इमारतींचे सॅनिटायझेशन झाले नाही. लोकप्रतिनिधी निर्जंतुकीकरण करीत असताना त्यालाही आडकाठी करण्यात आली. सुरुवातीला चाचण्या अधिक होण्याची गरज होती, त्या वेळी चाचण्यांची संख्या वाढवली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होतच राहिला. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती, त्यांनी स्वबळावर कोरोनावर मात केली. त्यामुळे महापालिकेने किमान १ लाख मुंबईकरांच्या अँटिबॉडी टेस्ट कराव्यात ज्यातून सत्य परिस्थिती समोर येईल, अशी मागणीही भाजपने केली आहे.
शेलार यांच्या टीकेवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लागलीच प्रतिउत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नागरिकांच्या खात्यात १५ लाख तर आले नाहीत; पण १५ लाख लोकांना कोरोनाची बाधा मात्र झाली. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे आमची बौद्धिक क्षमता नसल्याने आम्ही आमच्या अल्पबुद्धीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य वैद्यकीय उपचार, नवीन रुग्णालयांची उभारणी, चाचण्यांची संख्या वाढवून चेस द व्हायरससारखी प्रभावी कार्यपद्धती अंमलात आणली. ज्याची प्रशंसा आयसीएमआरने केली. धारावीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची जगभरातून तारीफ झाली. परंतु भाजप नेत्यांच्या ते पचनी पडले नाही. त्यांच्या मते आम्ही थाळ्या वाजवल्या, दिवे लावले पाहिजे होते; किंवा जनतेला भाभीजींचे पापड वाटले असते तर कोरोना नेस्तनाबूत झाला असता.
मोदीजींच्या कर्तबगारीमुळे कोरोना परदेशातून भारतात आलाच नाही तर आज कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात तिसºया क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करीत आहे, अशा शब्दांत सावंत यांनी शेलार यांच्या टीकेचा समाचार घेतला. मोदी कोरोना विरोधातले युद्ध २१ दिवसांत जिंकणार होते; परंतु कोरोनाच्या साथीने भारतीयांविरोधात युद्ध करीत आहेत, असेही सावंत म्हणाले.