मुंबई : राज्यसभेच्या दोन जागा लढायच्या की तीन याबाबत भाजपच्या श्रेष्ठींनी कोणताही आदेश अद्याप दिलेला नाही. काँग्रेसकडून दिल्लीतून उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसल्याने या दोन्ही पक्षांचा खोळंबा झाला आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार गुरुवारी अर्ज भरणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावरून बुधवारी परतले. आता एक-दोन दिवसात भाजप संसदीय मंडळाची बैठक होऊन देशभरातील राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित होतील. त्याचवेळी भाजपचे महाराष्ट्रातील दोन उमेदवार कोण? याचा फैसला होईल व सोबतच तिसरी जागा लढवायची की नाही, हेही ठरेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर तिसरी जागा निश्चितच लढवू आणि नक्कीच जिंकू. दोन उमेदवार देण्याच्या नादात आपला पहिला उमेदवार (संजय राऊत) पडणार नाही ना, याची काळजी शिवसेनेने घ्यावी.