वैधानिक समित्यांमध्ये भाजपाही दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 05:06 AM2019-03-25T05:06:32+5:302019-03-25T05:06:35+5:30

लोकसभा निवडणुकीनिमित्त जुन्या मित्रांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचे सूर जुळले आहेत. मात्र, यामुळे गेली दोन वर्षे महापालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपा नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

BJP contenders in statutory committees | वैधानिक समित्यांमध्ये भाजपाही दावेदार

वैधानिक समित्यांमध्ये भाजपाही दावेदार

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीनिमित्त जुन्या मित्रांमध्ये पुन्हा एकदा मैत्रीचे सूर जुळले आहेत. मात्र, यामुळे गेली दोन वर्षे महापालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपा नगरसेवकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपद मिळण्यासाठी काहींनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. सत्तेतील वाटेकरी वाढल्यामुळे शिवसेनेमधील इच्छुक नगरसेवकांमध्ये मात्र अस्वस्थता वाढली आहे.
गेली २५ वर्षे महापालिकेत शिवसेना-भाजपाची युती होती. तरीही शिवसेनेने दिलेल्या एखाद-दुसऱ्या समित्यांच्या अध्यक्षपदावरच भाजपा नगरसेवकांना समाधान मानावे लागत होते. त्यातच महत्त्वाच्या समित्या शिवसेना स्वत:कडेच राखून ठेवत असल्याने भाजपा नेत्यांमध्ये नाराजी होती. २०१७ मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपा नगरसेवकांना सत्तेची स्वप्ने पडू लागली. मात्र, पहारेकऱ्यांची भूमिका पदरात पडल्यामुळे वैधानिक समित्यांचे अध्यक्षपद भूषविण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते.
लोकसभा निवडणुकीनिमित्त पुन्हा शिवसेना-भाजपात युती झाल्यामुळे वैधानिक व विशेष समित्यांमध्ये हिस्सेदारी मिळावी, अशी मागणी भाजपा नगसेवकांकडून होऊ लागली आहे. या समित्यांचे कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहेत. त्यामुळे स्थायी, सुधार, बेस्ट आणि शिक्षण या चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक ३ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर, सहा विशेष समित्या व १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. यावेळेस शिवसेनेतील इच्छुक नगरसेवकांमध्येच रस्सीखेच सुरू असताना त्यांना आता भाजपा दावेदारांच्या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागणार आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजपाने सोडली नाही़ आता दिलजमाई झाल्यानंतर पालिकेत हा बदल दिसून येत आहे़ त्यामुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत़

Web Title: BJP contenders in statutory committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा