मुंबई : प्रदेश भाजपच्या गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती पक्षाचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी घेतली. आरोप-प्रत्यारोपांचे घमासान प्रभारींसमोर झाले. मित्रपक्षांनी कुठे मदत केली नाही याचा पाढा राज्यातील काही नेत्यांनी वाचला.
अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात अपेक्षित मदत केली नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार, प्रमुख नेते हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करत होते, याची माहिती तीन नेत्यांनी प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या बैठकीत दिली. त्यात प्रामुख्याने दिंडोरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा आदी मतदारसंघांची उदाहरणे देण्यात आली. शिंदेसेनेचे नेते काही मतदारसंघांमध्ये आपल्या सोबत नव्हते याची उदाहरणे देताना जालना, पालघरमधील काही घटनांचा उल्लेख नेत्यांनी केला, अशी माहिती आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वीसहून अधिक नेते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला आणि त्याचा फटका बसला असे सांगत राज्यातील नेत्यांनी यावेळी ती चूक न करता जागावाटप लवकर करावे आणि मित्रपक्षांना तशी स्पष्ट सूचना करावी, तसेच निवडणुकीशी संबंधित निर्णयांबाबत दिल्लीऐवजी प्रदेश भाजपला अधिकार द्यावेत, असे साकडे राष्ट्रीय प्रभारींना घातले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महत्त्वाचे विषय दिल्लीहून हाताळले जात होते. स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घेता येत नव्हते. त्यामुळे वेळेत निर्णय होणे आवश्यक असतानाही ते होऊ शकले नाहीत, असा तक्रारींचा सूरही नेत्यांनी यावेळी लावल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिंदेसेनेला १५ जागा देण्याची गरज नव्हती...
भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांची मोठी पीछेहाट झाली याकडे एका नेत्याने लक्ष वेधल्याची माहिती आहे. या नेत्याच्या अशा अचानक पवित्र्याने अनेकांची पंचाईत झाली. यादव आणि वैष्णव यांनी आपल्या मतदारसंघातील पिछाडीबाबत प्रमुख नेत्यांची झाडाझडती घेतली.
लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेला १५ जागा देण्याची गरज नव्हती, आता विधानसभेला आपल्याला त्रास होऊ शकतो असे सांगत दोन नेत्यांनी विधानसभा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा हे सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक शुक्रवारीदेखील होणार आहे.