वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपा नगरसेवक असंवेदनशील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:45 AM2018-08-18T03:45:30+5:302018-08-18T03:45:49+5:30
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले.
-मनोहर कुंभेजकर
मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले. काल, शुक्रवारी सकाळी १० वाजता गोरेगाव येथील विस्तारित वीर सावरकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला. या वेळी भाजपाच्या नगरसेवकांनी तेथे फोटोसेशन केले. यावरून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपावर हल्लाबोल केला. देशाच्या माजी पंतप्रधानाच्या निधनाबाबत त्यांचे स्वपक्षीय नगरसेवक असंवेदनशील कसे काय असू शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
वाजपेयी यांच्या निधनानंतर वीर सावरकर उड्डाणपूल कोणताही समारंभ न करता खुला करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. मात्र, भाजपाच्या पी-दक्षिण विभागातील नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता लव्याजम्यासह या पुलावर फोटोशूट केले, सेल्फी काढल्या. याबद्दल विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपा नगरसेवकांची श्रेयवादाची लढाई व असंवेदनशीलतेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता वीर सावरकर पुलाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्याने, सर्व राजकीय कार्यक्रमांसह या पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला व अगदी कोणताही समारंभ न करता हा पूल खुला करण्यात आला होता.