भाजप नगरसेविका विनयभंग प्रकरण: महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:23+5:302021-09-24T04:07:23+5:30

महापौरांची पत्रकारांना माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप नगरसेविका विनयभंगप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करून घेणाऱ्या बोरिवली पोलिसांची ...

BJP corporator molestation case: Mayor meets Deputy Commissioner of Police | भाजप नगरसेविका विनयभंग प्रकरण: महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

भाजप नगरसेविका विनयभंग प्रकरण: महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

Next

महापौरांची पत्रकारांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप नगरसेविका विनयभंगप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करून घेणाऱ्या बोरिवली पोलिसांची तसेच परिमंडळ ११ च्या उपायुक्तांची भेट महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी घेतली. या प्रकरणात कोणतीही कुचराई न करता आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी महापौरांना दिले. त्यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच नगरसेविका त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.

महापौर साडेचार वाजण्याच्या सुमारास बोरिवली पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेना नेत्या डॉ. शुभा राऊळ तसेच अन्य वरिष्ठ महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कार्यालयात त्यांनी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची भेट घेत भाजप कार्यकर्ता विनयभंगप्रकरणी चर्चा करीत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी याप्रकरणी कोणतीही कुचराई करणार नाही तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन त्यांना पोलिसांनी दिल्याचे महापौर म्हणाल्या. बोरिवली पोलिसांकडे पीडित महिलेने महिनाभरापूर्वी लेखी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल झाला. महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांवर आम्हाला विश्वास आहे. आरोपी पळून गेल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी मला तसे काही सांगितले नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. चित्रा वाघ यांच्याबद्दल विचारले असता, ‘मला रडणाऱ्या बाईबद्दल बोलायचे नाही’, असा टोला त्यांनी लगावला. वकिलावर दिवसाढवळ्या तलवारीने झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आलेले परिमंडळ ११ आता महिलांबाबत घडलेल्या गुन्ह्याला पाठीशी घालत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार याची वरिष्ठांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे यावेळी पदाधिकारी म्हणाले.

Web Title: BJP corporator molestation case: Mayor meets Deputy Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.