मुंबई - राणीबागेत मंगळवारी पेंग्विनच्या पिल्लाचा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी त्याला देण्यात आलेल्या नावांवरून सध्या मुंबईत चांगलेच राजकारण सुरू झाले आहे. यावेळी पेंग्विनला 'ऑस्कर' हे इंग्रजी नाव दिल्यावरून भाजपने टीका केली. यामुळे महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आणि त्यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना, पुढच्या वेळी हत्तीच्या पिलाला चंपा, तर माकडाच्या पिलाचे नाव चिवा ठेवू, असे म्हटले होते. त्यांचा रोख चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर होता. यानंतर आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर (Rajeshree Shirwadkar) यांनीही पेडणेकरांवर खोचक टीका केली आहे.
मुंबईत सुरू झालेल्या नेत्यांच्या या सरकशी राजकारणात आता भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही उडी घेतली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी एक ट्विट केले आहे. यात, "ओळखा पाहू कोण ??? असे म्हणत, राणीच्या बागेत नांदते, हत्ती सारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि अख्खी फाईलच गिळते," असे शिरवाडकर यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाला 'ऑस्कर' नाव दिल्यावरून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत मराठी नाव नसल्यावरून टोला लगावला होता. याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या, "त्यांना कोणती नावे द्यायला हवी होती; चंपा, चिवा दिली असती तर तिही नावे ठेवली असती. वाघिणीच्या बछड्याचे नाव वीराच आहे. पेंग्विन हे मुलांचे आकर्षण आहे. इतक्या खालच्या स्तरावर ही टीका सुरू आहे. पुढच्या वेळी नावे चंपा, चिवा अशी ठेवू यात काहीही समस्या नाही. येणाऱ्या हत्तीच्या बाळाचे नाव आता आम्ही चंपा ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू."