भाजप नगरसेवकांचे महापालिका मुख्यालयात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 01:36 AM2020-06-07T01:36:34+5:302020-06-07T01:36:42+5:30

एक लाख खाटांचा मागितला हिशेब । काळ्या फिती लावून निषेध

BJP corporators hold agitation at NMC headquarters | भाजप नगरसेवकांचे महापालिका मुख्यालयात धरणे आंदोलन

भाजप नगरसेवकांचे महापालिका मुख्यालयात धरणे आंदोलन

googlenewsNext

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेने एक लाख खाटा उपलब्ध केल्याचा दावा प्रशासन करीत आहे. अनेक रुग्णांना अद्यापही रुग्णालयात खाट मिळण्यासाठी वणवण करावी लागत आहे. व्हेंटिलेटर मिळाले नाही म्हणून शेकडो गंभीर रुग्णांनी प्राण सोडले, असा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात तोंडावर काळी पट्टी बांधून एक तास मूक धरणे आंदोलन केले. त्यानंतर भाजप शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे या तक्रारींकडे लक्ष वेधले.

राज्य सरकारच्या आदेशाला १४ दिवस होऊनही आजपर्यंत खासगी रुग्णालयातील खाटा, अतिदक्षता-व्हेंटिलेटर खाटा मुंबईकरांसाठी उपलब्ध झालेले नाहीत. मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६ हजार खाटांबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली. खाटा २४ तासात ताब्यात घ्या, पालिका व खासगी रुग्णालयांतील सर्व उपलब्ध खाटांची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी. तसेच खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांच्या उपचारांचे दरपत्रक प्रसिद्ध करावे, या मागण्यांसह भाजप नगरसेवकांनी आयुक्त, महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यानंतर भाजप शिष्टमंडळाने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची शुक्रवारी दुपारी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली. मुंबईतील मृत्यूदर आता ३.३ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. रुग्ण दुप्पट वाढीचा कालावधी १२ दिवसांवरून आता थेट २० दिवसांवर आला आहे. यावरून परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे योग्य नियोजन, रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच चाचण्यांचे सुसूत्रीकरण, चाचण्यांचे अहवाल तातडीने देण्याचे निर्देश, अशा निरनिराळ्या कामांमधून प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी शिष्टमंडळाला सांगितले.

खासगी रुग्णालयातील खाटा, अतिदक्षता-व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध झालेले नाहीत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६ हजार खाटांबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे़

Web Title: BJP corporators hold agitation at NMC headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.