पालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता टार्गेट, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 10:50 AM2018-07-28T10:50:14+5:302018-07-28T10:55:08+5:30
पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीच्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीच्या भाजपाच्या सहा नगरसेवकांनी शुक्रवारी ( 28 जुलै) मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावर पी दक्षिण वॉर्डमधील सर्व नगरसेवक व येथील सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांची आपण लवकर एकत्रित बैठक बोलावणार असून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. यासंदर्भात पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 58 चे भाजपा नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांच्यासह या वॉर्डचे भाजपा नगरसेवक दीपक ठाकूर (प्रभाग 50), नगरसेविका प्रीती सातम (प्रभाग क्रमांक 52), हर्ष भार्गव पटेल (प्रभाग क्रमांक 55), राजुल देसाई (प्रभाग क्रमांक 56), श्रीकला पिल्ले (प्रभाग क्रमांक 57) यावेळी उपस्थित होते.
पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ पी दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष संदीप दिलीप पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील प्रभाग समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. सदर बातमी शुक्रवारी लोकमत ऑनलाईन वर पडताच या वॉर्डसह सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तर आजच्या लोकमतच्या अंकात देखील सदर बातमी प्रसिद्ध झाली. आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत संदीप पटेल यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी येथील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा पाढाच वाचला.
पी दक्षिण वॉर्ड हा मोठा वॉर्ड असून येथे अनेक नागरी समस्या आहेत. आमचे काही येथील पालिका अधिकाऱ्यांशी वैर नाही. मात्र येथील नागरिकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या आमच्याकडून विविध नागरी कामे वेळेवर झाली पाहिजेत अशी रास्त अपेक्षा आहे. आमच्या समस्या व तक्रारी येथील अधिकारी सोडवत नाही, फोन व मेसेजला उत्तर देत नाही अशा तक्रारी येथील उपस्थित नगरसेवकांनी यावेळी केल्या. त्यामुळे आमच्या विभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे अशी ठाम भूमिका भाजपा नगरसेवकांनी यावेळी आयुक्तांकडे मांडल्याचे पटेल यांनी लोकमतला सांगितले. यावेळी आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले.
भाजपा नगरसेवकांनी रेल्वेने पालिका मुख्यालयात जाणे पसंत केले. कारण वाहनांनी पालिका मुख्यालयात जाण्यासाठी मुंबईच्या वाहतूक कोंडीत किमान दोन ते अडीच तास लागतात. यामध्ये वेळेचा देखील मोठा अपव्यय होतो. आपण नगरसेवक झाल्यापासून गेली दीड वर्षे पालिका मुख्यालयात ट्रेनने जातो. त्यामुळे पी दक्षिण वॉर्ड मधील नगरसेवकांना तुम्ही पण पालिका मुख्यालयात ट्रेन या, बघा तुमचा किती वेळ वाचतो हे पटवून दिले आणि आता त्यांनी ट्रेनने येणे पसंत केले अशी माहिती संदीप पटेल यांनी लोकमतला दिली.
गेल्या 29 मार्चपासून गोरेगाव ते सीएसटी हार्बर लोकल सुरू झाल्यामुळे गोरेगावकरांची मोठी सोय झाली आहे. शुक्रवारी आयुक्तांना भेटण्यासाठी हार्बरने गोरेगाववरून दुपारी 3.05 ची ट्रेन व सीएसटीवरून गोरेगावला येताना 5.45 ची गोरेगाव ट्रेन पकडली. जाताना व येताना विभागातील समस्यांवर विचारविनिमय, हास्यविनोद, गप्पा यामुळे ट्रेनचा प्रवास कधी संपला हे कळलेच नाही असे नगरसेवक दीपक ठाकूर व नगरसेविका प्रीती सातम यांनी सांगितले.