मुंबई: आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात जातीय दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते रविवारी मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्यादृष्टीने न्यायालयात राम मंदिराची सुनावणी सुरू आहे. सरकारकडे आगामी निवडणुकीच्या प्रचारात बोलण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा नाही. त्यामुळे देशात हिंदू- मुसलमानांमध्ये जातीय दंगली घडवून निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यासाठी भाजपाकडून काही मुस्लिम संघटनांबरोबर बोलणी सुरू आहेत. न्यायालयाने राम मंदिराच्या उभारणीला परवानगी दिली की, देशात दंगलींना सुरूवात करा, असे या मुस्लिम संघटनांना सांगण्यात आले आहे. जेणेकरून लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची मते मिळवता येतील आणि निवडणूक जिंकता येईल, असा भाजपाचा डाव आहे.राम मंदिर हे निश्चित झालं पाहिजे, जे आमचं आहे, देशांच आहे, ते उभं राहिलंच पाहिजे. मात्र, तुम्हाला दंगली घडवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला राम मंदिर नको. मग राम मंदिराच्या उभारणीला विलंब झाला तरी चालेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपाला देशात जातीय दंगली घडवायच्यात; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 9:24 PM