संभाजीराजेंसोबतच्या मोडलेल्या शब्दावरून भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:55 AM2022-05-28T07:55:04+5:302022-05-28T07:55:40+5:30
जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटे बोलू शकतात, ते अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटे बोलू शकतात
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडल्याचा आरोप शुक्रवारी संभाजीराजे छत्रपती यांनी केला. संभाजीराजे यांच्या आरोपानंतर भाजपने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची संधी साधली. विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा करत आरोप करणारे उघडे पडल्याचा दावा भाजपने केला आहे.
जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटे बोलू शकतात, ते अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटे बोलू शकतात हे आज पूर्णपणे सिद्ध झाले आहे. ‘त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिले होते’ असा खोटा दावा कोण करत होते हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे, अशी टीका भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन उद्धव ठाकरे यांना दिले गेले नव्हते. परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वत: मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वत:च्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि
महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, हेच आजच्या संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झाल्याचे भातखळकर म्हणाले.