भ्रष्टवाद्यांना सत्तेत बसवणं, शिवसेनेनं केलेले पाप जनता विसरणार नाही; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 08:38 AM2022-05-13T08:38:08+5:302022-05-13T08:38:33+5:30
बाळासाहेबांनी कधीही मतांचे लांगूनचालन केले नाही. कधीही सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. मात्र तुम्ही सोयीस्करपणे त्यांच्या नावाचा वापर करताय हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहतेय असा टोला केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले असा आरोप करत भाजपाने ट्विटरवरून त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर राज्यात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अशी राजकीय लढत पाहायला मिळाली. आता सामना अग्रलेखातून शिवसेनेने शरद पवारांच्या भूमिकेचं समर्थन करत भारतीय जनता पार्टीचा समाचार घेतला आहे. त्याला भाजपानेही आता प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी म्हटलंय की, बाळासाहेबांचं हिंदुत्व विज्ञानवादी पुरोगामी होते असं ‘सामना’वीरांनी अग्रलेखात म्हटलं आहे. आपल्या सोयीनुसार हिंदुत्वाची व्याख्या बदलणाऱ्या शिवसेनेला सत्तेसाठी शरद पवार(Sharad Pawar) जे बोलले त्याला समर्थन करण्याची वेळ आली आहे. जवाहर राठोड यांच्या कवितेत कुठेही साल्यांनो, तुमच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही अशी विधानं नाहीत. कवितेची मोडतोड करून ती पुढे करायचं आणि त्याचं केविळवाणं समर्थन शिवसेनेला करावं लागतंय हे दुर्देवी आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सामान्य कष्टकरी, शोषितांच्या भावना भाजपा जाणते, त्यामुळे केंद्रात ‘सबका साथ, सबका विकास’ २०१४ पासून आजपर्यंत लोकांच्या मनात नरेंद्र मोदींबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळे पुरोगामीचं सोंग करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेनं महाराष्ट्रात त्यांची जागा दाखवली. परंतु तुम्ही मोदींच्या नावावर निवडून आलात आणि मुख्यमंत्रिपदासाठी त्याच भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी त्यांना सत्तेत बसवलं हे पाप जनता विसरणार नाही. असली, नकली, घंटाधारी, गदाधारी या हिंदुत्वाच्या व्याख्या त्यातूनच निर्माण होत आहेत. बाळासाहेबांनी कधीही मतांचे लांगूनचालन केले नाही. कधीही सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. मात्र तुम्ही सोयीस्करपणे त्यांच्या नावाचा वापर करताय हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहतेय असा टोला केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
जवाहरची कविता विद्रोही आहे, समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करणारी आहे. नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, राजा ढाले यांनी जी वाट कवितेत निर्माण केली त्याच वाटेने जाणारी ही जवाहरची ‘पाथरवट’ आहे. त्यातली एक बंडखोर कविता पवारांनी वाचून दाखवली. पवारांसारखे राजकारणी आजही वाचतात. भाजपवाल्यांना वाचनाचे वावडे आहे. ते वाचत नाहीत म्हणून वाचले नाहीत. त्यांच्या सांस्कृतिक गटांगळ्या सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिराचा लढा काय होता? साने गुरुजीही काळाराम मंदिराच्या लढय़ात होते.
बाळासाहेबांचं हिंदुत्व पुरोगामी; शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपाचा शिवसेनेकडून समाचार
ब्रह्मदेवाच्या निरनिराळ्या अवयवांपासून चातुर्वर्ण्य निर्माण झाले या भोळसट कल्पनेवर जोतिबा फुले यांनी हल्ला केला. जिथे देवाचे स्वरूपच माणसाने ठरविले तिथे माणसाचे स्वरूप तुम्ही कोण ठरवणार? असा परखड सवाल जोतिबांनी विचारला. तेव्हा पुण्यातील कर्मठांनी जोतिबांना जगणे कठीण केले. हिंदुत्वाचा पुरस्कार आजचे भाजपवाले करू पाहत आहेत व त्यांना देशात वेगळ्या पद्धतीची तालिबानी व्यवस्था निर्माण करायची आहे. सामान्य माणसाला धर्माच्या उलटसुलट विचारांत अडकवायचे व पोटातली भूक विसरायला लावायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत असा आरोप शिवसेनेने भाजपावर केला आहे.