Join us

हर्षवर्धन पाटील-शरद पवारांची भेट, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 5:27 PM

BJP DCM Devendra Fadnavis News: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगेंना तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली शरद पवारांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

BJP DCM Devendra Fadnavis News: माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र याठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपा लढणार की राष्ट्रवादीच लढवणार हा संभ्रम असताना भाजपातील इच्छुक हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

कोल्हापूरातील कागल तालुक्याचे भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी आगामी विधानसभेला 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबरला शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी घाटगे यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. यातच आता लगेचच हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने भाजपामधील अस्वस्थता वाढल्याचा दावा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट शब्दांत माहिती दिली.

आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे

माझ्याशी राजकीय कुणी काही बोलले नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले हे माहिती नाही. माझ्याकडून अशी कुठलीही भूमिका इतर पक्षांत जाण्याची झालेली नाही. माझ्याशी कुणी संपर्क साधला नाही. अजित पवारांचे जे दौरे सुरू आहेत, त्यात तालुक्याचा जो विद्यमान आमदार असेल त्यांना ती जागा मिळणार असे बोलले जात आहे. साहजिकच आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझी अशी चर्चा झाली होती. अजितदादा म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस इंदापूरबाबतीत जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन. भाषणातही असा उल्लेख केला होता. मलाही देवेंद्र फडणवीस मी इंदापूरबाबतीत निर्णय घेईन असे म्हटले आहेत. त्यामुळे मी वाट बघतोय की फडणवीस काय निर्णय घेतात, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

 हे खरे असले तरी मला विश्वास आहे की...

कोण कोणाची भेट घेत आहेत, याकडे जाऊ नका. भारतीय जनता पार्टी खूप मजबूत आहे. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यात प्रवेश झाले, त्या मागील आठवड्यातही प्रवेश झाले. आता पुढेही प्रवेश होणार आहेत. निवडणुकीच्या काळात इकडचे काही तिकडे जातात, तिकडचे काही इकडे येतात, हे खरे असले तरी मला विश्वास आहे की, हर्षवर्धन पाटील असतील, आमचे इतर नेते असतील, ते आमच्या सोबत राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसहर्षवर्धन पाटीलमहायुतीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४