Nitin Desai ND Studio: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, यानंतर पोलीस करत असलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाचा मुद्दा विधानसभेतही चर्चेला आला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडी स्टुडिओचे कर्ज आणि त्याबाबतच्या गोष्टींची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात नितीन देसाई यांच्या निधनासंदर्भात चर्चा झाली. राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. नितीन देसाई यांच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात संशय आहे. यासंदर्भात काँग्रेस सदस्य अशोक चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला. नितीन देसाई यांनी मराठी चित्रपटात वेगळी छाप उमटवली. चांगला स्टुडिओ उभारला. चांगले काम नितीनजी यांनी केले. जे पाहतोय, ऐकतोय ऑडिओ क्लिपमधून त्यांनी पुरावे दिले आहेत. कर्ज वसुलीसाठी लोक जाचक पद्धतीने त्यांच्या मागे लागले होते का? असे इम्प्रेशन तयार झाले आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. लिलाव न करता शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
याची सखोल चौकशी सरकार करेल
ही गोष्ट खरी आहे, त्यांच्यावर कर्ज होते. स्टुडिओ गहाण ठेवला होता, निकाल त्यांच्याविरोधात गेला होता. स्टुडिओ सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. कुठे जाणीवपूर्वक स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला का? नियमाच्या बाहेर जाऊन व्याज लावून अडकवण्याचा प्रयत्न झाला का? याची सखोल चौकशी सरकार करेल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचे नाव होते. मराठी माणसाला अभिमान वाटावा असे काम त्यांनी केले. केवळ हिंदी चित्रपटच नाही, अनेक राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, त्या कार्यक्रमात कुठली थीम असली पाहिजे, यासाठी त्यांना बोलावल जायचे, ते थीम सुद्धा तयार करुन द्यायचे. दिल्लीमधील चित्ररथ आपण त्यांच्याच माध्यमातून तयार करायचो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील घाट सुंदर बनवले, त्यामध्ये त्यांच योगदान आहे. एका अतिशय हरहुन्नरी कलावंत, कलादिग्दर्शकाचा मृत्यू अतिशय दुर्देवी आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही ऑडिओ क्लिपही समोर आल्या आहेत. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.