“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:42 PM2024-07-03T17:42:20+5:302024-07-03T17:45:46+5:30

BJP DCM Devendra Fadnavis News: महायुती सरकारने पारदर्शी प्रक्रिया राबवत नोकरभरतीचा विक्रम केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism in vidhan parishad about paper leak and unemployment issues | “हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

BJP DCM Devendra Fadnavis News: नीट आणि युजीसी नेट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीवरून देशभरात विरोधक आक्रमक झाले आहेत. या पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले जात आहे. राज्यातही पेपरफुटीच्या बाबतीत कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी पेपरफुटी, नोकऱ्यांवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. 

विधान परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महायुती सरकारच्या काळात एकही पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. जलसंधारणाच्या परीक्षेत एक विद्यार्थी सापडला होता. त्याच्या प्रवेश पत्रावर काही आकडे सापडले होते. त्यामुळे ती परीक्षा पेपर फुटला, असे समजून रद्द केली. पेपर फुटला असता तर त्या विद्यार्थ्याचे १०० पैकी १०० उत्तरे बरोबर यायला हवी होती. त्याची ४८ उत्तरे बरोबर आली, ५२ चुकली. पण तरी ती परीक्षा रद्द केली, एफआयआर केला. याव्यतिरिक्त पेपरफुटीचा एकही एफआयआर नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा

देवेंद्र फडणवीसांच्या या माहितीबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला. यावर, तुम्ही पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका. अधिकृत सांगत आहे. हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा. याव्यतिरिक्त ४७ घटना या बोगस उमेदवार बसवला, कॉपी करताना पकडले अशा आहेत. यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली नाही. काही लोकांनी असा प्रयत्न केला होता. पण नरेटिव्ह तयार करण्यात येते की, रोज पेपर फुटतायत. पण तसे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. 

महायुती सरकारने नोकरभरतीचा विक्रम केला 

नोकरभरतीचा विषय मांडला गेला. या सरकारने नोकरभरती पारदर्शीपणे करून विक्रम केला आहे. ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. पैकी ५७ हजार ४५२ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. १९ हजार ८५३ जणांची परीक्षा वगैरे सगळे झाले आहे. येत्या महिन्याभरात नियुक्ती आदेश जातील. म्हणजे एकूण ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी देण्यात आली आहे. हा कोणत्याही सरकारच्या काळातला विक्रम आहे. आगामी तीन महिन्यात ३१ हजार २०१ पदांच्या नियुक्ती आदेशांचे काम पूर्ण होईल. येत्या तीन महिन्यांच्या काळात १ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम आमच्या सरकारने केला. ६९ लाख १५ हजार ४७१ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. त्यातून ही पदे भरण्यात आली. हे सगळे होत असताना त्यात पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis replied opposition criticism in vidhan parishad about paper leak and unemployment issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.