Join us

“उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे”; देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 6:48 PM

Maratha Reservation Bill: मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation Bill: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी नोकरीतील आरक्षणाबाबत विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावत उत्तर दिले. 

मला खात्री आहे, ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मंजूर झाले. याचा अर्थ असा की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी मला आशा आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्याबद्दल धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे दिलेले आरक्षण टिकेल. आता हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिले आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर यासंदर्भात कळेलच. तसेच मराठा समाजातील बांधवांना कुठे आणि किती नोकऱ्या मिळणार आहेत, हेही सरकारने जाहीर केले तर सोन्याहून पिवळे होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की, आता राज्यपालांच्या सहीने मराठा आरक्षणाचा कायदा पास झाल्यानंतर सर्व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच विधेयक पास झाले आहे. त्यांना असा प्रश्न पडण्याचे काही कारणच नाही. उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे. त्यांना विश्वास योग्य आहे, हेही आम्ही दाखवून देऊ. तसेच त्यांना माहिती आहे की, मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सवलात कोणी देऊ शकेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारच देऊ शकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, याबाबतचे प्रश्न आपण उद्धव ठाकरेंना विचारा की, त्यांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणत आहेत की, मुसलमानांना आरक्षण दिले जायला पाहिजे. हा प्रश्न माझ्यापेक्षा आपण उद्धव ठाकरेंना विचारु शकता. आमची पहिल्या दिवसापासून भूमिका पक्की आहे की, धार्मिक आधारावर आरक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात उल्लेख नाही. आम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे संविधानापेक्षा वेगळा निर्णय भाजपा आणि महायुती सरकार घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमराठा आरक्षणविधान भवन