“मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:45 PM2024-06-05T15:45:24+5:302024-06-05T15:48:37+5:30

BJP DCM Devendra Fadnavis News: भाजपाला जो काही सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी स्वीकारतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

bjp dcm devendra fadnavis said i take responsibility for defeat in maharashtra | “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी अधिक धक्कादायक ठरले. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाला मोठा फटका बसला. देशपातळीवर तसेच राज्यातही भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. यानंतर मुंबईतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधला. मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आरक्षण दिल्यानंतरही एक नरेटिव्ह करण्यात आला. त्यावर आम्ही प्रभावी उत्तर देऊ शकलो नाही. अनेक ठिकाणी त्याचा परिणाम झाला. मराठवाड्यात विशेष फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याचा परिणाम झाला. उमेदवाराबाबतची नाराजी असेल, ती सुरुवातीला लक्षात आली नाही. मात्र, त्यानंतर ती हळूहळू लक्षात आली. त्यात आता पुढे सुधारणा करण्यात येईल. आम्ही जे प्रभावी काम केले आहे, ते पुढे नेण्याचे काम करू. प्रयत्न अधिक वाढवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ. समन्वयाचे काही विषय असतील, त्यावर चर्चा करू. एकूणच या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रचंड मेहनत केली. प्रचंड फिरले. तळागाळापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम, संघटित करण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी केले. मुंबई अध्यक्षांनीही पक्ष सक्रीय ठेवला. आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी दोन्ही अध्यक्षांचे चांगले काम या निवडणुकीत केले, त्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. कितीही आकडेवारी मांडली तरी जागा कमी आल्या ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. या निवडणुकीचे नेतृत्व भाजपाकडून एकप्रकारे मी केले. त्यामुळे जो काही पराभव झाला असेल आणि जागा कमी झाल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी मान्य करतो की, मी यात कमी पडलेलो आहे. ती कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला जो काही सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला. याची सगळी जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी स्वीकारतो आहे. पक्षाला एक विनंती करणार आहे की, विधानसभेसाठी पूर्ण वेळ उतरायचे आहे. त्यामुळे भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारकडून मोकळे करावे आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्यासाठी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिने मला काम करता येईल. अर्थात सरकारमधून बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचे आहे, ते ती आमची टीम करेल. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे. ते सांगतील, त्यानुसार कारवाई करेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis said i take responsibility for defeat in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.