“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:26 PM2024-07-05T19:26:29+5:302024-07-05T19:29:08+5:30
Devendra Fadnavis News: राजकारणातील लोकांनी रोहित शर्माकडून शिकायला हवे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी एक सल्ला दिला आहे.
Devendra Fadnavis News: भारतीय क्रिकेट संघाने २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी टी२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. टीम इंडियाने टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवत विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय संघ भारतात दाखल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन टीम इंडियाने भेट घेतली. तर मुंबईत प्रचंड विजयी मिरवणूक काढत वानखेडेवर मैदानावर मोठा जल्लोष सोहळा पार पडला. यानंतर विधान भवनात चार मुंबईकर खेळाडूंचा सर्व आमदारांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एक लाख क्षमतेचे स्टेडियम व्हावे, अशी मागणी केली.
भारतीय संघातील चार मुंबईकर क्रिकेटपटूंचा सन्मान महाराष्ट्राच्या विधानभवनात करण्यात आला. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर विधान भवनात या सर्वांचा सत्कार करून विशेष कौतुक करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात रंजक पद्धतीने केली. मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख व्हाइस कॅप्टन अजित पवार असा केला. तसेच सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना, अंपायरच म्हणावे लागेल, अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचे? असा खोचक सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अशी नावे घेतली. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचेही स्वागत केले. तसेच आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. अपराजित टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिले. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि यापुढे आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणार नाही, असे सांगून दु:खही दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रोहित शर्माकडून राजकारणातील लोकांनी शिकायला हवे
ज्या क्रिकेटपटूंच्या नावाशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, या यादीत आता रोहित शर्माचे नाव जोडले गेले आहे. राजकीय लोकांना माझा सल्ला आहे. रोहित शर्मा जेव्हा प्रेस कॉन्फरन्स करतो, ती आपण पाहिली पाहिजे. कमीत कमी बोलून, आपल्या बॉडी लँग्वेजनेही उत्तर देता येते. हे रोहित शर्माकडून निश्चितपणे शिकता येऊ शकते. रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकोद्गार काढले. आम्हाला टीम इंडियाचा अभिमान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, मुंबईत ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच. अतिशय सुंदर स्टेडियम आहे. येथे आशिष शेलार उपस्थित आहेत. आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठे स्टेडियमची आवश्यकता आहे. येत्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, बीसीसीआय या सगळ्यांना जी काय मदत लागेल, ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. वानखेडे स्टेडियमची सर कोणालाही येणार नाही. त्याची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. ते ऐतिहासिक स्टेडियम आहे. मुंबईत आधुनिक सुविधांनी सुसज्ज, एक लाख लोक मावतील, असे स्टेडियम आपण सर्वांनी मिळून करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.