BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता प्रचार, सभा यांच्यावर भर दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे नेते, स्टार प्रचारक विविध ठिकाणी रॅली, सभा घेताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ एका सभेला संबोधित केले. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तर राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत कौतुक केले.
राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशाचा विकास पंतप्रधान मोदीच करु शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. राज ठाकरे यांचे आभार मानतो की, देशाला काय हवे आहे, त्याची नाडी त्यांना कळली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM मोदी
मुंबईकरांना आवाहन करतो की, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचे बटण दाबाल तर ते मत पंतप्रधान मोदींना मिळेल. पंतप्रधान मोदींनी १० वर्षात जे परिवर्तन केले, मजबूत भारत तयार केला. काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट हवी तशी वक्तव्ये करतात ती पाहून मला आश्चर्य वाटते. उद्धव ठाकरेंचे नेते कोण, तर राहुल गांधी. कांग्रेसचे नेते कोण तर राहुल गांधी. आमच्यासह महायुतीचे नेते कोण तर नरेंद्र मोदी. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण इंडिया आघाडी तयार झाली आहे, त्यात प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो. आम्ही मोदींच्या नेतृत्वात काम करतो आहोत. विकासाची ट्रेन पुढे घेऊन जातो आहोत. मुंबईकरांनी विचार करायचा आहे की, नरेंद्र मोदींच्या ट्रेनमध्ये बसायचे की राहुल गांधींच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
दरम्यान, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान मोदींनी जो विकास केला, तो फक्त ट्रेलर होता. येत्या ५ वर्षांत मुंबईसह देशाचा विकास नरेंद्र मोदी करणार आहेत. उद्धव ठाकरेंकडे २५ वर्षे मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी केलेले एक काम दाखवावे. पियूष गोयल हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी उत्तर मुंबईतून निवडून येतील, हे माहिती असल्यानेच काँग्रेसला इथे उमेदवार मिळत नाही. ठाकरे गटाने ही जागा स्वतःकडे घेतली नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.