Devendra Fadnavis News: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे आणि नेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते उपस्थित होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले आहे. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, सुषमा अंधारेंबद्दल प्रश्न विचारला असता, सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नसते, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी आपण उपस्थित कसे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले.
शिवसेना आणि भाजप ही इमोशल युती
शिवसेना आणि भाजप ही इमोशल युती आहे. गेली २५ वर्ष आम्ही एकत्र आहोत. आम्ही विचाराने आणि मनाने एक आहोत. तसेच नीलम गोऱ्हे यांचा प्रवेश होत आहे. नीलमताई आणि आमचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे सहाजिकच माझी इच्छा होती की, या पक्षप्रवेशाला उपस्थित राहावे. नीलमताईंना शुभेच्छा द्याव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्याप्रमाणे नीलमताई दुसऱ्या पक्षातून प्रवेश करत नाहीत. तर खऱ्या अर्थाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू आहे आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताई यांनी या पक्षात प्रवेश केला. नीलमताई यांनी विचार करून हा निर्णय घेतला आहे. सगळ्यांच्या वतीने नीलमताईंचे मनापासून अभिनंदन करतो, असे मनोगत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आमची युती वैचारिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब, अटलजी, प्रमोद महाजन यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले सरकार राज्यात स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्तावील सरकार त्याच विचारांवर काम करत आहे. ज्यांना टीका करायची, त्यांना करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेक पदाधिकारी, माजी आमदार खासदार, जिल्हाप्रमुख आमच्यात येत आहेत. मनीषा कायंदे आल्या. उपसभापती पदावर काम करत असताना नीलमताई आल्या. बाळासाहेबांना अभप्रित असलेले निर्णय घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्यामुळेच अनेकजण सोबत जोडले जात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.