“विद्यार्थ्यांकडे १० ते १५ लाखांची मागणी, दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द”; फडणवीसांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:53 PM2021-09-25T12:53:41+5:302021-09-25T12:57:24+5:30
राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे.
मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे. यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचा मोठा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (bjp devendra fadnavis alleges health department and rajesh tope over postponed exam)
UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द
भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेतील घोळाबाबत मोठा आरोप केला आहे. या प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडे ५, १० ते १५ लाख रुपयांची मागणी करुन भरती करण्याचे आश्वासन दिले जात आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
“किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा”
दलालांचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी
आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोळ घातला आहे. प्रवेश पत्र देताना कुणाला उत्तर प्रदेश तर कोणाला इतर ठिकाणचे प्रवेश पत्र दिले. पण आम्हाला माहिती यात मिळाली आहे की आरोग्य विभागाच्या परीक्षेत भरतीसाठी दलाली केली जात आहे. आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतय की परीक्षा रद्द होऊन पुढे ढकलण्यात आली आहे. या सरकारचा घोळ काही समजत नाही. या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, विद्यार्थ्यांचे नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच हे दलाल कोण आहेत ते समोर आले पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत, त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे. हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की, सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करत ‘तो’ निर्णय थांबवण्यास भाग पाडणार का?”
दरम्यान, परीक्षा १०० टक्के होणारच, परीक्षा रद्द झाली नसून ती पोस्टपोन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. आयटी विभागाने निवड केलेल्या कंपनीच्या अधिपत्याखालील हा विषय आहे. पण, आमच्या विभागातील नोकरीचा विषय असल्याने बैठक घेऊन आम्ही परीक्षेची तारीख निश्चित करू, असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.