मुंबई:नाशिक येथे सुरु असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार तथा लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या काही कर्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. यानंतर आता या घटनेवर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मात्र, यावरून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अप्रत्यक्षरित्या या घटनेचे समर्थन केले असले तरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे कृत्य अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रे असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया
संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्याचे प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आले असते. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिले असेल. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिहिले गेले असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहीत असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अशी काही घटना घडेल याची कुणकुण होती. संभाजी ब्रिगेडचा त्यांच्याशी काही तरी वाद आहे. पण संभाजी ब्रिगेड त्यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडतील असे वाटत होते. पुण्यातून दोन जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झाले आणि या दोघांनी त्यांच्यावर काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत हे लोक काळी पावडर फेकून पळून गेले, असा घटनाक्रम छगन भुजबळ यांनी सांगितला.