MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 03:38 PM2021-12-12T15:38:12+5:302021-12-12T15:38:49+5:30

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

bjp devendra fadnavis criticised maha vikas aghadi thackeray govt over mhada exam postponed | MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस

MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई: म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यावरून विरोधी पक्ष असलेला भाजप चांगलाच आक्रमक झाला असून, याप्रकरणी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापूर्वी आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यातच भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, किती दिवस आणि किती वेळा सहन करायचे, अशी विचारणा केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरोग्य भरती परीक्षेचा घोळ झाला. पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत गेले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे, असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?

किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही, अशी विचारणा करत पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून केला आहे. 

दरम्यान, सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस असल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ आली. महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे, त्यांना पोरांच्या भविष्याची काळजी नाही, असे टीकास्त्र पडळकरांनी सोडले.
 

Web Title: bjp devendra fadnavis criticised maha vikas aghadi thackeray govt over mhada exam postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.