Join us

Devendra Fadnavis: “‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते, आता सरकारचे ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरु”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 8:47 PM

Devendra Fadnavis: आता मुख्यमंत्री म्हणतात तुटून पडा पण, लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुंबई: या देशात एक वाघ तयार झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने, ज्यांनी कलम ३७० रद्द करून दाखविले. आता शिवसेना म्हणते, तुम्ही पाकिस्तानबद्दल काय बोलता, चीनबाबत बोला ना. काय अवस्था झाली शिवसेनेची. गेल्या काही दिवसांत किरीट सोमय्या यांच्यासह अन्य नेत्यांवर हल्ले झाले. राज्यात या महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीची अवस्था आणून ठेवली. महाविकास आघाडी सरकारने बिल्डर, दारु दुकानदार, विदेशी मद्यपिंना मदत केली. बारा बलुतेदारांना काहीच दिले नाही. मुख्यमंत्र्यांचे 'वर्क फ्रॉम होम' माहिती होते. आता सरकारचे 'वर्क फ्रॉम जेल' सुरू आहे, अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. 

मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. आता मुख्यमंत्री म्हणतात तुटून पडा पण, लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही. पोलिसांच्या बळावर हल्ले काय करता? आम्ही घाबरणार नाही, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर तुटून पडा ना. किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर! आला कोरोना, घर भरोना हीच तुमची नीती ठरली. यशवंत जाधव म्हणतात की,  मी तर माझ्या मातोश्रींचीच झोळी भरली. कुणी घडीवर कुणी माडीवर, कोट्यवधींचाच वाढला वावर जमलेच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्‍यांच्या टोळीवर, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

सत्तेसाठी नाही, तर आपल्याला मुंबईकरांसाठी संघर्ष करायचाय

मुंबईची निवडणूक का महत्त्वाची? सत्तेसाठी नाही, तर आपल्याला मुंबईकरांसाठी संघर्ष करायचा आहे. मुंबईकरांना त्यांची मुंबई पुन्हा सोपविणे, हेच आपले ध्येय, हाच आपला संघर्ष असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. तर, ते हिंदू नाहीत, असे म्हणून मला हिंदुत्वाची संख्या कमी करायची नाही. हिंदुत्वही आचरण पद्धती आहे, असे सांगतानाच तुमचे सवंगडी जेलमध्ये जातात आणि तरीही ते पदावर असतात, अशावेळी महाराष्ट्राची देशात बदनामी होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असे सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यात सुरू असलेल्या हनुमान चालिसा वादावरुन शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवार म्हणतात हनुमान चालिसा म्हटल्याने काय बेरोजगारांचे प्रश्न सुटणार आहेत का?. पण, इफ्तार पार्ट्या झाडल्यानेही बेरोजगारांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी झाली असून आमच्या सरकारमध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होता, आता तो मागे गेल्याचे फडणवीसांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारात पुढे असून कंत्राट देण्याच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराजकारणभाजपा