Devendra Fadnavis on Mumbai Metro: “मेट्रो उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नाही तरी चालेल, पण...”; देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:19 PM2022-04-02T17:19:55+5:302022-04-02T17:21:04+5:30
Devendra Fadnavis on Mumbai Metro: मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न देण्यात आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
मुंबई: गेली अनेक वर्षे उत्सुकता असलेल्या मुंबई मेट्रोच्या ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), नगरविकास मंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदींची उपस्थिती राहणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना न दिल्यामुळे मानापमान नाट्य रंगले असून, भाजपने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी जरूर उद्धाटन करावे. पण जनतेला हे माहिती आहे, या दोन्ही मेट्रो आणि याचं काम देखील सुरू मी केले होते. अतिशय वेगाने ते काम पुढे गेले होते. काही कारणाने या सरकारमध्ये ते रखडले. पण आता ते सुरू होतेय. आम्हाला बोलावले नाही तरी चालेल मात्र पण सगळ्या मेट्रो सुरू करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मेट्रो ३ चा रखडलेला प्रकल्प हा तत्काळ पूर्ण करावा
आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण मेट्रो ३ चा प्रश्न निकाली काढा. कारण, मेट्रो ३ जी आतापर्यंत सुरू होऊ शकली असती, ती आणखी चार वर्षे सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे सरकारने श्रेय जरूर घ्यावे. पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो ३ चा रखडलेला प्रकल्प हा तत्काळ पूर्ण करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर सकाळी ६ ते रात्री १० अशी वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार आहे. ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही मार्गिकेचा मिळून एकूण २०.७३ किमीचा हा टप्पा असणार आहे. या मार्गावर स्वयंचलित ११ मेट्रो धावणार आहेत. असे असले तरी सुरुवातीचे काही महिने मेट्रोचालक (मेट्रो पायलट) मेट्रो चालविणार आहेत. त्यानंतर विनाचालक मेट्रो धावणार आहेत.