Devendra Fadnavis On Nawab Malik: “नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारवर दाऊदचा दबाव हे स्पष्ट होईल”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:29 PM2022-03-15T13:29:37+5:302022-03-15T13:31:27+5:30
Devendra Fadnavis On Nawab Malik: नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंतरिम दिलासा देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) फेटाळली आहे. ईडीने सूड भावनेने कारवाई केल्याचा युक्तिवाद नवाब मलिकांच्या वकिलांनी केला होता. परंतु मलिकांवर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहे. टेरर फंडिंगचा या आरोप आहे. त्यामुळे ईडीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केला असून, मलिकांची याचिकांची फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपने नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याच्या मागमीसंदर्भात आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला होता. यामध्ये हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमले होते. यावेळी नवाब मलिकांचा राजीनामा घेईपर्यंत संघर्ष कायम ठेवणार असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली. यानंतर मुंबई हायकोर्टाने ईडीची कारवाई योग्य असल्याचे सांगत नवाब मलिकांना दिलासा देण्यास नकार दिला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.
हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर काम करतंय हे स्पष्ट होईल
नवाब मलिकांनी ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाद मागितली होती. मात्र, हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली. नवाब मलिकांची केस हायकोर्टात सुरू असल्याचा बचाव राज्य सरकार करत होते. मात्र, आता हायकोर्टानेही स्पष्ट निकाल दिला आहे. आता जर नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तर हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर काम करतंय हे स्पष्ट होईल, या शब्दांत ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत दाऊदचा दबाव राज्य सरकारवर आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागले, असेही स्पष्ट केले.
राष्ट्रवादीला जनाची नाहीतर मनाची लाज असली पाहिजे
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही नवाब मलिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्याप्रकरणी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीला जनाची नाहीतर मनाची लाज असली पाहिजे. आतातरी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. हे सरकार दाऊदच्या इशारावर काम करत आहेत हे आता दुर्दैवाने सांगावे लागत आहे, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.