मुंबई: राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूकही (Vidhan Parishad Election 2022) अत्यंत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचा उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड विजयी झाले आणि एकच जल्लोष करण्यात आला. भाजपच्या पाचही उमेदवारांच्या विजयानंतर भाजपचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मीडियाशी संवाद साधला. विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजय हा महाराष्ट्रातील परिवर्तनाची नांदी असून, लोकाभिमुख सरकार येईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
विधान परिषद निवडणुकीतील विजय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. राज्यसभा निवडणुकीत भाजपला १२३ मते मिळाली होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना १३४ मते मिळाली. काँग्रेसपेक्षा आमच्या उमेदवाराला जास्त मते मिळाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे मतेच नव्हती
महाविकास आघाडीत मोठा गोंधळ आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खरे तर आमच्या पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे मतेच नव्हती. मात्र, महाविकास आघाडीतील अंतर्गत वादामुळे आमच्या पाचव्या उमेदवाराला मते मिळतील, असा विश्वास होता. भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचा विजयाला हातभार लागला. त्यांचेही आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लढा जनतेसाठी, सत्तेसाठी नाही
महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. महाविकास आघाडीतील ही नाराजी मतांमध्ये परावर्तित झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर चालणारे लोकाभिमुख सरकार राज्यात आणणार, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मी चमत्कार वगैरे मानत नाही. असंतोष वाढत राहिला, तर काय होऊ शकते, ते या निकालाने दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. तसेच आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नाही, तर जनतेसाठी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना ३०, उमा खापरे यांना २७ आणि प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली असून, सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.