मुंबई: महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने थेट धडक मारली. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन तात्परते मागे घेत असून, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, देशाचे वाट्टोळे केल्याबाबत काँग्रेसने माफी मागायला हवी, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून, भाजपने त्यांना पाठिंबा दिला. आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही
कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शने करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचे वाट्टोळे केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजप नेत्यांनी बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.