मुंबई: मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टिमेटम दिल्यावर तुम्ही घाबरलात आणि म्हणे बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आम्ही तिथे होतो. शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता. आमच्या ३२ नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मी स्वतः तेथे उपस्थित होतो. बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये १८ दिवस होतो, असे सांगत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काही जणांना वाटते, ते म्हणजेच महाराष्ट्र आहे, त्यांचा अपमान, मान-सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा मान-सन्मान, अवमान झाला. असे अजिबात नाही. महाराष्ट्रातील १८ पगड जातीच्या लोकांनी हा महाराष्ट्र घडवला आहे, समृद्ध केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच १४ मे रोजी पोलखोल सभा घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
बाबरी मशीद पाडली, तेव्हा मी सेंट्रल जेलमध्ये होतो
ते हिंदू नाहीत, असे म्हणून मला हिंदुत्वाची संख्या कमी करायची नाही. हिंदुत्वही आचरण पद्धती आहे, असे सांगतानाच तुमचे सवंगडी जेलमध्ये जातात आणि तरीही ते पदावर असतात, अशावेळी महाराष्ट्राची देशात बदनामी होते, अशी टीका फडणवीस यांनी केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असे सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतले.
आम्ही श्रेय घ्यायला गेलो नाही, कारण...
बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्यांचे श्रेय कधीही भाजपने घेतले नाही. तेथे उपस्थित असणारे सर्व रामसेवक, रामभक्त होते. कारसेवक होते. तत्कालीन सरकारनेही कारसेवक घटनास्थळी असण्याचा उल्लेख केला आहे. प्रभू श्रीरामांसाठी लाखो लोकांनी संघर्ष केला. आम्ही प्रसिद्धी घेणारे नाही, तर अनुशासन पाळणारे लोकं आहोत. मात्र, राम जन्माला आले होते का, असा प्रश्न विचारण्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या बाजूने एकदा सांगून टाका, अशी खोचक टिपण्णी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना केली.