Devendra Fadnavis: “पिक्चर अभी बाकी है... कालचा एक बॉम्ब, आणखी बॉम्ब ठेवलेत”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:03 PM2022-03-09T15:03:48+5:302022-03-09T15:12:04+5:30
Devendra Fadnavis: हा संघर्ष देशभक्तांचा देशद्रोह्यांच्या विरोधात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई: नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली असून, आझाद मैदान ते विधान भवनापर्यंत धडक मोर्चाचे काढण्यात आला. आझाद मैदानातून निघालेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला. तत्पूर्वी आझाद मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विधानसभेतील आपल्या विधानाचा उल्लेख करत कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक होती. पिक्चर अभी बाकी है... आणखी बॉम्ब ठेवलेत, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिला.
हा संघर्ष साधा नाही. तर देशभक्तांचा संघर्ष आहे. देशद्रोह्याच्या विरोधात संघर्ष आहे. पाकिस्तान धार्जिण्या लोकांविरोधात संघर्ष आहे. ज्या भारतमातेसाठी अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या आरोपामुळे जेलमध्ये गेलेल्या मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर शांत बसू शकत नाही. ही मागणी केवळ राजकारणासाठी नाही. आम्ही रोज राजीनामे मागत नाही. मात्र ही घटना पाहिली तर मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत ज्यांनी आर्थिक व्यवहार केले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कालचा एक बॉम्ब, आणखी बॉम्ब ठेवलेत
विधानसभेतील आपल्या आरोपांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक होती. पिक्चर अभी बाकी है... आणखी बॉम्ब ठेवले आहेत. तुम्ही आमच्याविरोधात षडयंत्र करत आहात. पण आम्ही घाबरणार नाही. एका नरेंद्र मोदीला संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला. परंतु जनतेचा आशीर्वाद असल्यानं ते जागतिक नेते झाले. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्यामागे आहे. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाही. आमच्याविरोधात कितीही षडयंत्र केले तर शिवरायांच्या आशीर्वादाने ते हाणून पाडू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी तो फोडला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेजी तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावे लागेल
नवाब मलिक आणि दहशतवाद्यांचा जो जमीन व्यवहार झाला त्यामागे सूत्रधार दाऊदची बहीण हसीना पारकर होती. या पैशाचा वापर मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी झाला. काळ्या पैशातून जमीन खरेदी करून टेरर फंडिंग केले गेले. या टेरर फंडिंगला महाराष्ट्रातील मंत्री मदत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला एकदिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यावे लागेल. कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? तुम्ही मलिकांचा राजीनामा घेतला नाही, तरी आमचा संघर्ष सुरूच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शरद पवार म्हणतात की, राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्यातील प्रश्नांची सरकार पडलेली नाही. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांसारख्यांना हे सरकार पाठिशी घालण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही, तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाही. दाऊदने फोन केला म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.