मुंबई - राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते. शक्ती कायदा कुठे आहे? शक्ती नव्हे तर भक्ती सुरु आहे. नेत्यांची भक्ती करायची. या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत. आजच्या काळात रार्जरोसपणे घटना घडतात त्यावर काहीच होत नाही ही चिंतेची बाब आहे. सरकारमध्येच डागी मंत्री असतील तर या सरकारकडून अपेक्षा काय करणार? असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) लगावला आहे.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोकं टीव्हीवरच दिसतात. काही कोंबडे दिवसभर चॅनेलवर दिसतात. गरुडावर कावळा बसतो. तो गरुडाला चोच मारतो. गरुड काहीही बोलत नाही. मग गरुड दोन्ही पंख पसरुन आकाशात झेप घेतो. इतक्या उंचावर जातो की, कावळ्याला श्वास घेता येत नाही तो खाली पडतो. भाजपा गरुडासारखी आहे. कितीही डोमकावळे मानेवर बसले की एकदा आपण पंख पसरले तर या सगळ्यांना पुरून उरू असा उपरोधिक टोला नवाब मलिक(Nawab Malik), संजय राऊतांना(Sanjay Raut) नाव न घेता लगावला आहे.
…मग हा पोलिसांचा अपमान नाही का?
काही मोठे नेते ज्यावेळी म्हणतात आदिवासींवर अन्याय झाला त्यामुळे नक्षली विचारांकडे वळले. पण एकाही आदिवासीचं नक्षलींना समर्थन नाही. २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचा अपमान नाही का? नक्षलींना चीन, ISIS ची मदत आहे. भाजपाचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही. आम्ही कधीही निष्पाप लोकांवर हल्ला करणार नाही. आम्ही सर्व समावेशक राजकारण करणारे आहोत. एखाद्या अल्पसंख्याकावर हल्ला होत असेल तर तो परतवून लावू. पण आमच्या अंगावर कोणी आलं तरी त्याला सोडणार नाही. हिंदुंची दुकानं जाळू, मोर्चे काढू हे सरकार रोखणार नसेल तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
आपलं सरकार आलं तर बोनस, नाहीतर...
या सरकारच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित करुन लढा उभा करायचा आहे. महाविकास आघाडी सरकारनं सगळ्यांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसांची ताकद काय असते हे दाखवून देऊ. अर्ध्या मनानं लढाईला उतरायचं नाही. सरकार आलं तर बोनस. पण जनतेसाठी लढायला उतरायचं. लोकशाहीनं ज्या आंदोलनाचा अधिकार दिला ते आपलं शस्त्र आहे. जनतेचा मोदींवर विश्वास ती आपली शिदोरी. जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपा महाविकास आघाडीला पाणी पाजू. आगामी निवडणुकीत भाजपा स्वबळावर सरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.