एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; एका वाक्यात ट्विट, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:08 PM2022-06-21T22:08:31+5:302022-06-21T22:09:56+5:30
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले. त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय असतात. राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्या सडेतोडपणे भाष्य करत असतात. राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतरही अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या घडामोडींनंतर पुन्हा एका अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
एक ‘था’ कपटी राजा ……
अमृता फडणवीस यांनी, एक ‘था’ कपटी राजा …… असे ट्विट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सूचक शब्दांत टीका केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही वेळात हे ट्विट डिलिट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, भाजपची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा नाही, कुठलीही पूर्व योजना नाही, एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला, त्याचे पुढे काय होईल?, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
समझने वालो को इशारा काफी हैं!
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, ते घाईचे होईल. त्यामुळे भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, असे सांगत अडीच वर्षांपूर्वी अनैसर्गिकरित्या सरकार तयार झाले. तेव्हाच काही शिवसेनेचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचे नव्हते. भाजपला धडा शिकवण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे. असे सांगून त्यांना शांत करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केल्याची अनेक भाषणे आहेत. त्यामुळे हे सरकार अनेक नेत्यांना मान्यच नव्हते. त्यातूनच ही वाताहात झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यसभा, विधान परिषदेत सर्वपक्षीयांनी मदत केली
आमचा संपर्क सर्व पक्षातील नेत्यांशी होता. राज्यसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीतही सर्व पक्षांनी आम्हाला मदत केली. शिवसेनेतील नाराजीचे चित्र उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दिसू शकेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यसभेत भाजपने उभे केलेले तीनही उमेदवार निवडून आले. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही पाचही उमेदवार निवडून आले. हा देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्षपणाचा उत्तम नमूना आहे. राज्यसभेवेळी पहाटे ४-५ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस विधिमंडळात थांबले होते. आम्हाला मदत केलेल्या सर्वांना धन्यवाद देतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.