ठाकरे सेनेवर भाजपचा थेट निशाणा; मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची स्पेशल कॅग ऑडिट नेमून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:05 AM2022-08-25T06:05:25+5:302022-08-25T06:05:52+5:30

मुंबई महापालिकेत काही कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकाराची विशेष कॅग (महालेखापाल) नेमून चौकशी करण्यात येईल,

BJP direct target on Thackeray Sena Investigation of corruption in bmc by appointing special CAG audit | ठाकरे सेनेवर भाजपचा थेट निशाणा; मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची स्पेशल कॅग ऑडिट नेमून चौकशी

ठाकरे सेनेवर भाजपचा थेट निशाणा; मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची स्पेशल कॅग ऑडिट नेमून चौकशी

googlenewsNext

मुंबई :

मुंबई महापालिकेत काही कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकाराची विशेष कॅग (महालेखापाल) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवसेनेच्या हातात अनेक वर्षे असलेल्या महापालिकेतील घोटाळे आता चौकशी व कारवाईच्या रडारवर असतील.

मुंबईशी निगडित प्रश्नांसंबंधी सत्ताधारी पक्षातर्फे चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे असून त्याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी या चर्चेत सहभागी होताना केली होती. त्याची दखल घेत फडणवीस म्हणाले, महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तर रातोरात कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून कंत्राटे मिळविली आहेत. कोविड सेंटरमध्येही घोटाळे आहेत. रस्ते बांधण्यासाठी स्थानिक कंत्राटदार हा पात्र ठरतो, मात्र एल अँड टी सारखी मोठी कंपनी पात्र ठरत नाही. भेंडीबाजारातील इमारतींच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, तो कोणी तरी रद्द केला. यातदेखील भ्रष्टाचार झालाय. मुंबई महापालिकेतील काही कामांमध्ये तर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा वाईट पद्धतीने वळविण्यात आला आहे. या गैरव्यवहारांची स्पेशल कॅग नेमून चौकशी करण्यात येईल.

धारावी पुनर्विकासाची तीन महिन्यात निविदा
धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जागा देखील ८०० कोटी रु. देऊन घेण्यात आली आहे. पुढच्या तीन महिन्यात पुनर्विकासाची निविदा निघणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

गिरणी कामगारांना ५० हजार घरे देणार
गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझी नुकतीच भेट घेतली. गिरणी कामगारांनाही ५० हजार ९३२ घरे देणे शक्य आहे. त्यांना ही ५० हजार घरे देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

पोलिसांना मोफत घरे नाही
बीडीडी चाळीत पोलीस बांधवांच्या तीन पिढ्या राहत आहेत. त्यांना मालकी हक्काची घरे देणे हे आपले कर्तव्यच आहे. कालिदास कोळंबकर सातत्याने ही मागणी लावून धरत आहेत. ते शासकीय कर्मचारी असल्याने मोफत घरे देऊ शकत नाहीत. पोलिसांना मोफत घरे दिल्यास तोच नियम इतर शासकीय कर्मचाऱ्यांनाही लावावा लागेल. ते शक्य नाही. पण २५-३० लाखांचीही घरे त्यांना परवडणारी नाहीत. त्यामुळे नाममात्र दरात प्रसंगी अनुदान देऊन त्यांना मालकी हक्काने घरे देण्यात येतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बीडीडी व पत्राचाळीतील रहिवाशांना २५ हजार भाडे
बीडीडी व पत्राचाळीचा पुनर्विकास सुरू आहे. या इमारतीतील रहिवाशांना अनुक्रमे २२ व १८ हजार भाडे देण्यात येत होते. हे भाडे वाढविण्यात यावे, अशी रहिवाशांची मागणी होती. त्यानुसार हे भाडे २५ हजार करण्यात येत आहे व रखडलेले एसआरए प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले. 

खड्ड्यांचे दुकान बंद करणार 
मुंबईत १२०० किमीचे रस्ते पुढच्या तीन वर्षांत पूर्णपणे काँक्रिटचे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेच. ४०० किमीची निविदा निघाली आहे. २०० किमीची लवकरच निघेल. पुढच्या वर्षी आणखी ४०० किमीची निविदा निघेल. महापालिकेतील खड्ड्यांचे अर्थकारण कायमचे बंद करण्यात येईल.  

भाजपचे लक्ष्य ठाकरे सेना
मुंबई महापालिका हे घोटाळ्यांचे आगर असून या ठिकाणचे स्पेशल कॅग ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी केली होती. सरकार येताच त्यांनी या चौकशीची घोषणा केली आहे. भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी शिवसेनेच्या सत्ताकाळात महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे आरोप केले होते. महापालिका निवडणूक ताेंडावर असताना भाजपने ठाकरे सेनेला टार्गेट केले.

 

Web Title: BJP direct target on Thackeray Sena Investigation of corruption in bmc by appointing special CAG audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.