Join us  

भाजपात पेटला वादाचा ‘दिवा’

By admin | Published: January 04, 2015 1:12 AM

मुंबईतील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यावरून भाजपामध्ये धुसफुस सुरू झाली आहे़

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्यावरून भाजपामध्ये धुसफुस सुरू झाली आहे़ गेले दीड वर्षे पाठपुरावा व उपोषण केल्यानंतर या प्रकल्पातून नेत्यांनी कस्पटाप्रमाणे बाजूला केल्यामुळे आमदार व नगरसेवक अमित साटम यांची चडफड सुरू आहे़ त्यांची ही चीड भाजपा मुंबई अध्यक्ष डॉ. अशिष शेलार बोलावलेल्या पत्रकार परिषदेतही आज लपून राहिली नाही़ मुंबईतील पथदिव्यांची लक्स लेव्हल (प्रकाश क्षमता) अत्यंत कमी असल्याने सुशोभित दिवे लावण्याची मागणी सर्वप्रथम भाजपा नगरसेवक अमित साटम यांनी केली होती़ यासाठी त्यांनी उपोषणही केले़ तसेच आपल्या अंधेरी वॉर्डात खाजगी सर्वेक्षण करून लक्स लेव्हल किती कमी आहे, याचा पुरावाही त्यांनी दिला़ मात्र अ‍ॅड़ शेलार यांच्या पत्रामुळेच मुंबईत एलईडी दिवे लावण्याचा निर्णय झाल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेतून करण्यात आली़ या पत्रकार परिषदेत केवळ भाजपा अध्यक्ष शेलार आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक उपस्थित होते़ पत्रकार परिषद संपता संपता साटम यांनी त्या ठिकाणी येऊन व्यासपीठावर बसू का, असा सवाल अध्यक्षांना केला़ यावर बस म्हणून सांगावे लागते का, असे खोचक उत्तर शेलार यांनी दिले़ मात्र त्यानंतर पाचच मिनिटांत पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर करून शेलार निघून गेले़ शेलार यांनाच श्रेय देणारे प्रसिद्धीपत्रक वाचून साटम यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले़ मात्र काही न बोलताच साटमही थोड्या वेळाने ताडकन उठून बाहेर पडले़ दोन आमदारांच्या कोंडीत सापडल्यामुळे गटनेते कोटक यांची अवस्था मात्र केविलवाणी झालीहोती़ (प्रतिनिधी)श्रेयासाठी रस्सीखेचमुंबईतील रस्त्यांवर नवीन दिवे लावण्याचा पहिला प्रयोग मरिन ड्राइव्ह, कुलाबा, वांद्रे आणि मुलुंडमध्ये केला जाणार आहे़ यामध्ये अमित साटम यांचा वॉर्ड का नाही, असे विचारले असता साटम यांच्या अंधेरी वॉर्डात दिवे लावण्याचा प्रयोग झाला, असे अ‍ॅड़ शेलार यांनी सांगितले़ मात्र साटम यांनी आपल्या वॉर्डापासून एलईडी दिव्यांचा प्रयोग करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे सूत्रांकडून समजते़