BJP Diwali: दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची दिवाळीही जोरात, विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 02:05 PM2022-10-16T14:05:24+5:302022-10-16T14:06:18+5:30
BJP Diwali in Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आता दिवाळीमध्येही भाजपाकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने लागबाग, परळ तसेच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळी आदी भागांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दहीहंडी आणि नवरात्रौत्सवातील मराठी दांडियानंतर आता दिवाळीमध्येही भाजपाकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आता भाजपाकडून वरळीतील जांबोरी मैदान येथे मराठमोळा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर यादरम्यान, संध्याकाळी साडे सहानंतर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये संगीत आणि खाद्यसंस्कृतीचा सोहळा होणार असून, खास मराठमोळी वेशभूषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या वेशभूषा स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्यांना कार इलेक्ट्रिक दुचाकी, दुचाकी अशी बक्षीसं देण्यात येणार आहेत.
दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री नंतर आता भाजपा तर्फे दिवाळी ही जोरात.. वरळीच्या जांबोरी मैदानात भरणार महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘ मराठमोळी वेशभूषा’ स्पर्धा आणि मराठमोळा दिपोत्सव.. मोठ्या संख्येने सहभागी वा! pic.twitter.com/LknYQ7eUKD
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2022
भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर आता भाजपातर्फे दिवाळीही जोरात साजरी केली जाणार आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘ मराठमोळी वेशभूषा’ स्पर्धा आणि मराठमोळा दीपोत्सव आयोजित होणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.