Join us

'दबाव टाकून विरोधी पक्षाची लोकं घेण्याची भाजपाला गरज नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 1:28 PM

शरद पवारांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात येण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यातील मोजक्याच नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या लोकांवर ईडीची चौकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश मिळणार नाही. राष्ट्रवादीत नेते राहण्यास का तयार नाही याचं आत्मचिंतन शरद पवारांनी करावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांच्या पार्टीत नेते का राहण्यास तयार नाही याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. भाजपाची अवस्था आता पहिल्यासारखी राहिली नाही. लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाजपाला प्रचंड प्रमाणात यश दिलं आहे. त्यामुळे आता कोणावर दबाव टाकून लोकं आपल्या पक्षात घ्यावी अशी अवस्था भाजपाची नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपात येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक स्वत:हून इच्छुक आहेत. त्यांना फोन करण्याची आणि दबाव टाकून घेण्याची भाजपाला काहीच गरज नाही. मात्र आपल्या पक्षात लोकं का राहत नाही याचं आत्मचिंतन शरद पवारांनी करावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना लगावला आहे. 

शरद पवारांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार म्हणाले होते की, देश व राज्यातील प्रमुख तपास यंत्रणांचा धाक दाखवून अन्य पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या संस्थांच्या प्रमुखांना कायद्याच्या पलिकडे जाऊन मदत पुरवली जातेय. रासपचे आमदार राहुल कुल यांना अडचणीत आणून कांचन कुल यांना भाजपानं निवडणूक लढवायला लावली. पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यांचे खाते एनपीएमध्ये आहे. कूल यांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याला सरकारने आर्थिक मदत केली आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यास भाग पाडले. 

तसेच भाजपामध्ये येण्यासाठी दबाव चित्रा वाघ यांच्यावर टाकला. वाघ यांचे पती एसीबीच्या चौकशी जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नाही असं मी सांगितलं अशी माहिती शरद पवारांनी दिली. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा