मुंबई महापालिकेत भाजप ओरिजनल शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत 150 चा आकडा पार करेल. यानंतर आम्ही महापालिकेत 'सेवालय' सुरू करू. आतापर्यंत कंत्राटदारांचे केवळ 'वसुलीआलय' उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुतवात सुरू होते. आम्ही भाजप आणि शिवसेना मिळून खऱ्या अर्थाने सेवालय सुरू करू. तसेच, या 'सेवालया'च्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणून नसेल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शेलार लोकमतसोबत बोलत होते.
यावेळी बोलताना, आपण ठाकरेंच्या शिवसेनेने मुबई महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टारारासंदर्भात बोलत आहात. तसेच, आमच्याकडे मुंबई महानगर पालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही 'सेवालय' सुरू करू, असे म्हणत आहात, तर मग तुमच्या या सेवालयात यशवंत जाधव नेमके कोणत्या भूमिकेत असतील? असे विचारले असता शेलार म्हणाले, ते (यशवंत जाधव) शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. आम्ही प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई लढत आहोत. यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणून 'सेवालया'च्या दरवाजात नसेल.
कोण आहेत यशवंत जाधव - यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते होते. मात्र, शिवसेना पक्षात बंडखोरी करत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी, सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यशवंत जाधव यांनी गेल्या दोन दशकांमध्ये महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सलग चारवेळा त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. २०१७ मध्ये यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपविले. त्यानंतर २०१८ पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष होते.
भाजपतील काही नेत्यांनी यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर केंद्रीय आयकर विभागाने त्यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांच्या जवळपास ५३ मालमत्ता आयकर विभागाने जप्तही केल्या होत्या. यात भायखळा येथील फ्लॅट्स, हॉटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचाही समावेश होता.