मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपाने विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकेकाळी सत्तेत एकत्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आता एकमेकांच्या विरोधात विधानसभेत दिसणार आहेत. कारण, भाजपाने विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे आता ठाकरे विरुद्ध फडणवीस असाच 'सामना' आपल्याला विधानसभेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत.