मुंबई : निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतर उमेवारांना उमेदवारी दिल्याच्या रागातून मुलुंडमध्ये भाजपाविरुद्ध भाजपाचे पाच बंडखोर रिंगणात उतरले आहेत. या पाचपैकी चार उमेदवार हे गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे मुलुंडमध्ये पालिका निवडणुकीत भाजपाचा अंतर्गत वाद वाढलेला दिसून येत आहे.ईशान्य मुंबईत भाजपाने पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिल्याने अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. पूर्व उपनगरातील घाटकोपर आणि मुलुंड भाजपाचा गड मानला जातो. या ठिकाणी गुजराती मतदारांचा टक्काही अधिक आहे. भाजपाने या विभागात दिलेल्या उमेदवारीवरून मुलुंडसह घाटकोपर परिसरातील कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. या विभागात सहा प्रभाग येतात. यातील प्रकाश गंगाधरे यांचा १०४ प्रभाग सोडून अन्य प्रभागातील भाजपा उमेदवारांसमोर भाजपाचे नाराज पदाधिकारी अपक्ष म्हणून उभे आहेत. यामध्ये १०३मध्ये भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांच्याविरुद्ध वॉर्ड अध्यक्ष राकेश थवानी, १०५ कल्पना केणी विरुद्ध विजया पवार, १०६ प्रभाकर शिंदे यांच्यासमोर सुदेश कर्णिक, १०७मध्ये समिता कांबळे यांच्यासमोर वैशाली विरल शहा तर १०८मध्ये नील सोमय्याविरुद्ध गौतम खेमान हे अपक्ष म्हणून उभे आहेत.खासदारांनी त्यांच्या मुलाला उभे करण्यासाठी आम्हाला डावलले. तसेच नीलला उमेदवारी दिली. दुसरीकडे शिंदेंना उभे केले. त्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी आमच्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत, अशी भूमिका भाजपाचे नागराजन परमेश्वरन यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. (प्रतिनिधी)
भाजपाविरुद्ध भाजपाचा मुलुंडमध्ये सामना
By admin | Published: February 11, 2017 4:37 AM