भाजपा ‘फिप्टी-फिप्टी’वर ठाम
By admin | Published: January 19, 2017 06:15 AM2017-01-19T06:15:50+5:302017-01-19T23:02:22+5:30
युतीच्या बैठकीत भाजपाने फिप्टी-फिप्टीची मागणी करीत ११४ जागांवर हक्क सांगितला
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत १०० हून कमी जागा युतीमध्ये स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपाच्या नेत्यांनी घेतल्यामुळे शिवसेना-भाजपाची युती सुकर होण्याऐवजी आणखीच किचकट झाली आहे. भाजपाने १०६ जागा मागितलेल्या आहेत, असे शिवसेनेकडून तीन दिवसांपूर्वी सांगितले जात असताना आज झालेल्या युतीच्या बैठकीत भाजपाने फिप्टी-फिप्टीची मागणी करीत ११४ जागांवर हक्क सांगितला. यात वाटाघाटी करण्याची तयारी भाजपाने दर्शविली मात्र, १०० पेक्षा एकमी कमी जागा स्वीकारली जाणार नाही, असे बजावल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिवसेना-भाजपाच्या नेत्यांची बैठक आज मंत्रालयासमोरील बी-७ बंगल्यावर झाली. त्यावेळी भाजपाने ११४ जागा मागितल्याने शिवसेनेचे नेते बुचकाळ्यात पडले. इतक्या जागा आपण कशाच्या आधारे मागत आहात, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा, आम्ही मागत असलेल्या प्रत्येक जागेमागे ठोस आधार आणि आकडेवारीही आमच्याकडे आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले.
तसे असेल तर ती माहिती आपण आम्हाला द्या, असे शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीत सांगितल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यास होकार दिला. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी ही माहिती भाजपाकडून पोहोचविली जाणार आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला (आठवले गट) किती जागा द्यायच्या या विषयी अद्याप कुठलीही चर्चा दोघांमध्ये झालेली नाही. गेल्यावेळी रिपाइंने २८ जागा लढविल्या होत्या आणि त्या जागा शिवसेनेने आपल्या कोट्यातून दिलेल्या होत्या, असे शिवसेनेकडून आजच्या बैठकीत सांगण्यात आले.
आजच्या बैठकीला भाजपाकडून शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार तर शिवसेनेकडून खा.अनिल देसाई, आ.अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते. उद्या, गुरुवारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. युतीची चर्चा ज्या कुर्मगतीने सुरू आहे ती बघता युती न होण्याचीच शक्यता अधिक दिसते, असे आता बोलले जात आहे. त्यातच, शंभरपेक्षा एकही कमी जागा अस्वीकारार्ह असल्याचे भाजपाने स्पष्ट केल्याने तिढा वाढला आहे. शिवसेनेकडून भाजपाला जास्तीत जास्त ८० ते ८५ जागा (रिपाइंच्या कोट्यासह) सोडण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
>चर्चेत असलेल्या नेत्यांनाच नको युती
भाजपाकडून चर्चेत सहभागी झालेले विनोद तावडे, प्रकाश महेता आणि आशिष शेलार या तिघांनीही, ‘शिवसेनेसोबत अजिबात युती करू नये, भाजपाने स्वबळावरच लढले पाहिजे’, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर धरला होता. तेच नेते आता युतीसाठी चर्चेकरता पाठविण्यात आल्याने युती होऊच नये, या दृष्टीने ते एकेक फॉर्म्युला देत असल्याचे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ‘युती नकोच’ असा पूर्वग्रह असलेले नेते युतीसाठी चर्चा करतीलच कसे, असा मुद्दा सेनेच्या एका नेत्याने लोकमतशी बोलताना मांडला.