भाजपाचे आज मुंबईत भव्य 'शक्तीप्रदर्शन'; कार्यकर्त्यांच्या फौजा मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:29 AM2018-04-06T08:29:52+5:302018-04-06T08:34:39+5:30

आजच्या मेळाव्याच्यानिमित्ताने भाजपाला शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यासाठी होणाऱ्या गर्दीचे विक्रम मोडीत काढायचे आहेत.

BJP foundation day 2018 rally in Mumbai Full of muscle flexing and power show by party | भाजपाचे आज मुंबईत भव्य 'शक्तीप्रदर्शन'; कार्यकर्त्यांच्या फौजा मुंबईत दाखल

भाजपाचे आज मुंबईत भव्य 'शक्तीप्रदर्शन'; कार्यकर्त्यांच्या फौजा मुंबईत दाखल

Next

मुंबई: भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त शुक्रवारी मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करण्याच्यादृष्टीने पक्षाने या मेळाव्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख लोक कार्यकर्ते राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी काल रात्रीपासूनच भाजपाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली. भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून ३४ रेल्वेगाड्यांमधून भाजपाचे कार्यकर्ते येथे दाखल होणार असून, सात हजारांहून अधिक बसमधून कार्यकर्ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाहून येथे येणार आहेत. याशिवाय दहा हजार लहान वाहनांतून कार्यकर्ते बीकेसीत येणार आहेत. परिणामी शुक्रवारी बीकेसीकडे येत असलेल्या सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे अनेक प्रवाशी वेळेत विमानतळापर्यंत पोहोचू शकले नव्हते. एकूणच आजच्या मेळाव्याच्यानिमित्ताने भाजपाला शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यासाठी होणाऱ्या गर्दीचे विक्रम मोडीत काढायचे आहेत. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेलाही योग्य तो संदेश देता येईल.


यादृष्टीने  पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने आणि अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बेस्टकडूनही १७० जादा बसगाडय़ांचे नियोजनही करण्यात आले आहे. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील जेव्हीएलआर, एलबीएस रोड आणि ईस्टर्न फ्री वे तर पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड लिकिंग रोड वाहनचालकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.



 

Web Title: BJP foundation day 2018 rally in Mumbai Full of muscle flexing and power show by party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.