मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुलात शुक्रवारी होणाऱ्या भाजपाच्या महामेळाव्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी वांद्रयात भाजपा कार्यकर्त्यांच्या बस रोखून धरल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुंबईकरांची माफी मागितली. मुंबईत पाच-सहा वर्षातून भाजपाचा एखादा मेळावा होतो. त्यामुळे आजच्या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यासाठी मी मुंबईकरांची माफी मागतो. पण त्यांनी मुंबईत येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे स्वागत करावे, अशी विनंती मी करतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत भाजपाची अंतर्गत यंत्रणाही काम करत आहे. त्यामुळे लोकांनी आजचा दिवस आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन माधव भंडारी यांनी केले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे सध्या या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वांद्र्यात तर कालपासून सातत्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र, यामुळे तब्बल 4 ते 5 तास वाहतूक रखडली होती. यामुळे अनेकांना विमानतळावर वेळेत पोहोचता आले नव्हते.
मुंबईकरांनी थोडा त्रास सहन करावा; भाजपा कार्यकर्त्यांचं स्वागत करावं- माधव भंडारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 11:02 AM