मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण पक्षांतराने ढवळून निघाला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपा पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. 31 जुलै रोजी काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक अशा विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. या मेगाभरतीनंतर पुन्हा 10 ऑगस्टला भाजपामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजपासून महाजनादेश यात्रा सुरु होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात पहिल्या टप्प्यात ही यात्रा जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा-विदर्भातील अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजपात प्रवेश करतील.
पहिल्या टप्प्यात भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. राष्ट्रवादीतून आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच संदीप नाईक हे नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.
भाजप म्हणजे काही धर्मशाळा नाहीभाजप म्हणजे काही धर्मशाळा नाही, जिथे कोणीही उठावे आणि यावे. हा जनतेचा पक्ष आहे. जे चांगले काम करतात त्यांचे स्वागत आहे. येणाऱ्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच पक्षात प्रवेश दिला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ईडीसह अन्य तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजपा आमदारांना फोडत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यास मुख्यमंत्र्यांनीही चोख उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, धमक्या देऊन कोणाला पक्षात घेण्याची आवश्यकता नाही. एक काळ असता होती की भाजप कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
तसेच भाजपच्या विकासाचे काम पाहून अनेक नेते पक्षात येत आहेत. शिवाय, त्यांच्या येण्याने जुन्यांवर कोणताच अन्याय होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल. विधानसभेपर्यंत अजून खूप प्रवेश होतील. आलेल्यांना आणि येणाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वानुसार जागा आणि मान-सन्मान दिले जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.