नशामुक्त मालवणीसाठी ड्रग्जमाफियांविरोधात भाजप उतरली रस्त्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 09:22 PM2019-09-19T21:22:17+5:302019-09-19T21:24:48+5:30
निषेध फलक हातात घेऊन शेकडो विद्यार्थी सहभागी झाले ड्रग्जविरोधी आंदोलनात सामील
मुंबई - मालाड पश्चिम येथील नशामुक्त मालवणीसाठी ड्रग्जमाफियांविरोधात भाजप आज रस्त्यावर उतरली. यावेळी सुमारे 800 विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सहभागी झाले ड्रग्जविरोधी आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला.
मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात खुलेआम सुरू असलेल्या ड्रग्ज-नशेबाजीच्या विरोधात आज अनेक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भाजपा रस्त्यावर उतरली. "ड्रग्ज माफियांच्या दहशतीने मालवणी परिसरातील मैदानांचा रोज संध्याकाळी समाजकंटक लोक ताबा घेतात आणि तिथे खुलेआम नशेबाजीला प्रोत्साहन देणारे व्यवसाय केले जातात. त्यामुळे लहान-तरुण मुलं यांना खेळण्यासाठी तसंच नागरिकांना साधा फेरफटका मारण्यासाठीही मैदानं उपलब्ध होत नाहीत", असा आरोप उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला. यावेळी, "स्थानिक ड्रग्जमाफियांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी" अशी जोरदार मागणी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी सहायक पोलीस आयुक्त दिलीप यादव यांना निवेदन देऊन केली.
ड्रग्जमाफियांविरोधात मालवणीतील म्हाडा लेआऊट ग्राऊंडजवळ आज सकाळी 10 वाजता भाजपने निदर्शनं केली आणि निषेध मोर्चा आयोजित करून मालवणी पोलीस ठाण्याच्या जवळ निषेध सभा आयोजित केली. त्यात विविध शाळांचे 800 हून अधिक विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "नशेबाजीने मालवणी परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना नशेबाजीचं व्यसन लावलं आहे. अनेक कुटुंबं त्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत-होत आहेत. भविष्यात मालवणीतील युवा पिढी वाचवायची असेल तर या ड्रग्जमाफियांना आताच अटकाव करावा लागेल", असे ठाम मत भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केले.