लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील २८ लाेकसभा मतदारसंघांमधील तीन कोटी नागरिकांशी थेट संपर्क साधणारे ‘घर चलो’अभियान २० ऑगस्टपासून प्रदेश भाजप सुरू करत आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या मतदारसंघांमध्ये एक महिना दौरे करणार आहेत.
या अभियानाची सुरुवात बावनकुळे यांच्या चंद्रपूरच्या दौऱ्यापासून होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या ‘सरल ॲप’ मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती दिली जाईल.
रुग्णमित्र अभियान
बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षात राज्यात फ्रेंड्स ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी, युवा वॉरियर्स असे वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानात राज्यातील मोदी सरकारच्या योजनांच्या २ कोटी लाभार्थींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे एकत्रित करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ५० हजार रुग्ण मित्र तयार करण्याचे अभियानही सुरू करण्यात आले आहे.