Girish Mahajan Taunt Uddhav Thackeray ( Marathi News ): २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. राम मंदिराच्या लोकार्पणासाठी देशभरातील मान्यवारांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याचा दावा केला जात आहे. यावरून मानापमान नाट्य घडत असून, यावरून ठाकरे गटाने केंद्रावर जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रितांवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास आठ ते साडेआठ हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाव नसेल. राम मंदिरावरुन ते टीका करतात. उद्धव ठाकरेंना बोलवण्याचे कारण काय? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली.
घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे
केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील. उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल. घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. त्यांचे काही योगदान नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. दुसरीकडे, राज ठाकरे यांना राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ज्या पद्धतीने टीका चालू आहे, ती खालच्या भाषेत चालू आहे. मला वाटते हे कुठेतरी थांबले पाहिजे. दोन नेत्यांमधील वाद थांबला पाहिजे. समाज, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये. छनग भुजबळ यांनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विनंती केली की आता हे थांबवा. मी ज्या दिवशी जरांगे पाटील यांच्याकडे गेलो त्यांनाही सांगितले की आता हे थांबवा. पुन्हा शब्दाला शब्द होऊ नये, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.